रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी
हातलोट घाटातील रूंदीकरण, सुधारणांना गती
खेड : पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणाऱ्या तसेच रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या हातलोट घाटरस्त्याच्या सुधारणा व रूंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. विधानभवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गृहराज्यमंत्री आणि आमदार योगेश कदम यांनी सक्रिय भूमिका घेतली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी महत्वाचे निर्णय व पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली.
वनविभागाची जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले असून, यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून या घाटाचे काम रखडले होते. तत्कालीन पर्यावरणमंत्री आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठपुरावा केला होता.
सध्या योगेश कदम यांनी ही जबाबदारी स्वतः घेतली असून, वनविभाग व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी बैठक घेतली. त्यांचा पुढाकार हाच या रस्त्याच्या प्रगतीचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.