ओझरे खुर्दमध्ये काजू बियांच्या १२ पोत्यांची चोरी
देवरुख
नजीकच्या ओझरे खुर्द येथील काजू फॅक्टरीतून चोरट्याने ५० किलो वजनाची १२ काजू बी पोती चोरट्याने लंपास केली आहेत. या प्रकरणी गुरुवारी रात्री देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश जागुष्टे यांचा ७३ हजाराचा माल चोरीला गेला.
याबाबत जागुष्टे यांनी पालिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १९ ते २६ जून या कालावधीत विराज डाफळे (सोनवडे) याने जागुष्टे यांच्या मालकीच्या काजू बिया साठवणुकीच्या खोलीचे पत्र्याचे हुक काढून पत्रा सरकवून ५० किलो वजनाची १२ काजू बी पोती चोरून नेल्याचे नमूद केले आहे.
विराज डाफळे याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.