
लोटे एमआयडीसीत राखेसह घनकचरा उघड्यावर
खेड: लोटे-पर्शुराम औद्योगिक वसाहतीतील तलारीवाडी परिसरात एका कंपनीकडून उघड्यावर राख व घनकचरा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र निषेध करत या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसे न झाल्यास प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लोटे एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडून प्रदूषणकारी कचरा खुलेआम टाकला जात आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचेच नव्हे तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्लक्ष झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा संजय आखाडे यांनी दिला.