
राजीवडा मासेविक्रत्यांना शेडमध्ये जागा द्या
मनसेची मागणी; राजीवडा जेटची संयुक्त पाहणी
रत्नागिरी : मत्स्यविभागामार्फत राजीवडा जेटी येथे सुसज्ज शेड बांधण्यात आली आहे. तरी मासेविक्री करणाऱ्या महिला न बसता शिवखोलघाटीच्या पायथ्यापासूनच्या रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतो. रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने वाहतूककोंडीही होते. याबाबतच्या तक्रारीवरून मनसेने पालिकेचे अधिकारी, मेरिटाईम बोर्ड, मत्स्यविभाग व स्थानिक नागरिक यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली. स्वतंत्र शेडची दुरुस्ती करून रस्त्यावर बसणाऱ्या मासेविक्रत्यांना तत्काळ त्या शेडमध्ये हलविण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली.
अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगर पालिकेच्या दारात, अशा घोषणा देत पालिकेवर मनसेने मोर्चा काढला होता. पालिकेच्या कारभारावर बोट ठेवून मुख्याधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला होता. त्या वेळी दिलेल्या पत्रात मनसेने अनधिकृत होर्डिंगसह अनेक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पुराव्यासह मुख्याधिकाऱ्यांना शहरातील अनेक गैरसोयींविषयी माहिती दिली. मुख्याधिकाऱ्यांनी सोमवारपासून बदल होताना दिसतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मोर्चाच्या दुसरा दिवसापासूनच शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवायला सुरुवात केली होती. राजीवडा येथे मत्स्यविभागामार्फत सुसज्ज शेड बांधण्यात आली आहे. तिथे मासेविक्री करणाऱ्या महिला न बसता शिवखोलघाटीच्या पायथ्यापासूनच्या रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या नागरिकांना होत असल्याबाबतचे पत्र मनसेला प्राप्त झाले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने राजीवडा येथील मच्छीमार्केटमधील आरक्षित भूखंड व रस्त्यावर होणाऱ्या मासेविक्रीविषयी मनसेने आज पालिकेच्या अधिकारी, मेरिटाईम बोर्ड, मत्स्यविभाग व स्थानिक नागरिक यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली. तेव्हा स्वतंत्र शेड बांधलेली असूनही महिला मच्छीविक्रीसाठी रस्त्यावर बसतात. शेडमध्ये मासेमारीचे साहित्य साठवून ठेवले जाते ज्यामुळे संपूर्ण रस्ता अडून जातो. याबाबत मच्छीविक्री करणाऱ्या महिलांना समजावून ते साहित्य दोन दिवसात घेऊन जावे व रस्त्यावर बसणाऱ्या महिलांची सोय त्या शेडमध्ये करावी, अशी विनंती मनसेच्या सचिन शिंदे, अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर व बाबय भाटकर यांनी केली. तसेच शेडची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करावी लागेल, असे मत्स्यविभाग, मेरिटाईम बोर्ड तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. राजीवडा येथील शेडच्या बाजूला भराव करून शेडच्या विस्ताराबाबतीत तसेच अधिक काही मागणी असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालकमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून घेऊ, असे आश्वासनही दिले. या वेळी मनसेतर्फे अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर, बाबय भाटकर, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, शहर सचिव गौरव चव्हाण आदी उपस्थित होते.