
राजापुरात भंगार दुकानात चोरीचा प्रयत्न
राजापूर : राजापूर तालुक्यातील बंगलवाडी येथे भंगार दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली आहे. मल्लिक अर्जुन हुसेनी वाघमारे (वय ४८, रा. राजापूर बंगलवाडी) यांच्या भंगार दुकानाचे पत्रे काढून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी अनंत दत्ताराम मासये आणि अमर नारायण चिपटे (दोघेही रा. राजापूर बंगलवाडी) यांनी मल्लिक अर्जुन हुसेनी वाघमारे यांच्या बंगलवाडी येथील भंगार दुकानाचे पत्रे काढण्याचा प्रयत्न केला. चोरीचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला, तरी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी मल्लिक अर्जुन हुसेनी वाघमारे यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून, आजच दुपारी १.२८ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२), ६२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.