मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराने कुरधुंडा येथे बांधलेल्या संरक्षण भिंतीलाच संरक्षणाची गरज
सरपंच नाझीमा बांगी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; संबंधित कामाच्या चौकशीची मागणी
संगमेश्वर : तालुक्यातील कुरधुंडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेषतः, कुरधुंडा येथील दर्ग्याजवळ जे. एम. मात्रे कंपनीने बांधलेल्या १०० फुटांपेक्षा अधिक उंचीच्या संरक्षण भिंतीला अवघ्या काही महिन्यांतच मोठे तडे गेले असून, ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकरणी कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच नाझीमा बांगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जे. एम. मात्रे कंपनीमार्फत आरवली ते तळेकांटे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याचेच एक बोलके उदाहरण म्हणून कुरधुंडा येथील ही संरक्षक भिंत समोर आली आहे. बांधून काही महिने उलटले नसतानाच या भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे ती अत्यंत धोकादायक बनलीई आहे. या परिसरात शेतकरी आणि भाविकांची वर्दळ असते. ही भिंत कोसळल्यास त्यांना गंभीर दुखापत होण्याची किंवा जीव गमावण्याची भीती आहे. तसेच, महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांनी चुकून बाजूला गाडी घेतल्यास ती भिंतीसहित खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरपंच नाझीमा बांगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “महामार्गावर बांधलेली संरक्षण भिंत, गटारे, नाले आणि मोऱ्यांचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यापूर्वीही याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत, मात्र परिस्थिती जैसे थे आहे.” त्यांनी प्रशासनाने या कामाच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करून होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
या गंभीर तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा आहे. केवळ जिल्हाधिकारीच नव्हे, तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री (महाराष्ट्र राज्य), विभागीय अधिकारी रत्नागिरी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी, प्रांतअधिकारी रत्नागिरी, तहसीलदार संगमेश्वर, साई एजन्सी कार्यालय संगमेश्वर आणि पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. या उच्चस्तरीय निवेदनामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या धोकादायक भिंतीची तातडीने दुरुस्ती करून निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.