सांगवे येथे आढळला शँमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा
सांगवेतील विश्वास शेलार या तरूणाला शँमेलियन सरडा दिसला
देवरूख– संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथे शनिवारी दुर्मिळ शँमेलियन जातीचा सरडा आढळून आला आहे. सांगवेतील विश्वास गुलाबराव शेलार या तरूणाला काल शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा शँमेलियन जातीचा सरडा दिसून आला.
विश्वास शेलार हे शनिवारी दुपारी आपल्या कारमधून सांगवे ते देवरूख असा प्रवास करत असताना सांगवे येथे त्यांना रस्त्यावर हा शँमेलियन जातीचा सरडा दिसला. याचवेळी समोरून ट्रक येत होता. यावेळी त्यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबवण्यास सांगितले. ट्रक थांबवला नसता ट्रकचे चाक या सरड्यावरून गेले असते. ट्रक थांबवल्यानंतर विश्वास शेलार यांनी या सरड्याला रस्त्याच्या पलीकडे जावू दिले. विश्वास शेलार यांनी एकप्रकारे या शँमेलियन सरड्याचे प्राण वाचवले आहेत. शँमेलियन सरडा हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो. आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो. हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सरडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढऱ्या काट्यांची ओळ दिसून येते. या सरड्याची हालचाल अत्यंत संथ असते.
शँमेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. त्याचे खडबडीत शरीर, एकावर एक तीन शारस्त्राण घातल्यासारखं डाेकं, कडबाेळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शाेभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप आहे. सहसा तो झाडावरच राहताे. तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पिताे. या सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. शँमेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र असते. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे माकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य असते. त्याचे डाेळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची माेठी क्षमता असते. शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणीच आहे. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभाेवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्याच्यात असते.