नळपाणी’ योजनेच्या चरात पडून गायीचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा
राजापूर
शीळ भंडारवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेल्या चरामध्ये पडून गायीचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी ठेकेदार दिप्तेश प्रभाकर कदम (रा. बारसु, ता. राजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सुधाकर बिर्जे (४०, रा. शिळ भंडारवाडी, ता. राजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिप्तेश कदम यांनी घेतलेले पाईपलाईनचे काम मुदतीत पूर्ण केले नाही. तसेच, खोदलेले चर बुजवले नसल्याने, बिर्जे यांची तांबड्या रंगाची गिर गाय त्या चरामध्ये पडून मयत झाली.
या घटनेची माहिती दिप्तेशला देऊनही त्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच बिर्जे यांचे नुकसान झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिप्तेश कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.