जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्पाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठिय्या आंदोलन
रत्नागिरी: तालुक्यातील नांदिवडे येथे लोकवस्तीमध्ये जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम अनधिकृतपणे सुरू आहे. यावर तत्काळ कारवाई करून ते थांबवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी ठिय्या मांडत धरणे आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. शेवटी अप्पर जिल्हादंडाधिकार्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
नांदिवडे येथील जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरित करावा यासाठी गेले अनेक महिने ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या लढ्यात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाची हाक दिली होती; मात्र सागरी महामंडळाने गॅस टर्मिनलचे काम थांबवण्याचे आदेश दिल्याचे आंदोलकांनी सांगितले होते. त्यामुळे आज (ता. 28) ला होणारे हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते; मात्र प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी जिल्हाधिकार्यांच्या भेटीसाठी आले होते. या वेळी दिव्यांगांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नांदिवडे येथील गॅस प्रकल्पावरही चर्चा करण्यात आली.
नांदिवडे येथे गॅस प्रकल्प उभारताना जिंदल कंपनीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबईच्या नगररचना प्र. उपसंचालकांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे हे काम थांबवण्याचे पत्र जेएसडब्ल्यू पोर्टला दिले आहे. तरी टर्मिनलचे काम सुरू आहे. त्यामुळे या पत्रानुसार गॅस उभारणी प्रकल्पावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली. यावर चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र त्यावर विश्वास नसल्याने प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी जिल्हाधिकार्यांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडला. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह निघून गेल्यामुळे प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी संतप्त झाले व जिल्हाधिकारी निघून जात असताना, न्याय द्यावा म्हणून घोषणा देत मागणी केली. हा प्रकार रत्नागिरी शहर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी ठिय्या मांडणार्या कार्यकर्त्यांची समजूत घातली.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील, कोकण विभाग सचिव सुरेश मोकल, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, नांदिवडे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे व पदाधिकारी उपस्थित होते.