बसरा स्टारचा मिऱ्यावर मुक्काम वाढला
रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचा मुक्काम अजून वाढला आहे. २ जून २०२५ या जहाजाला किनाऱ्यावर अडकून पाच वर्षे होतील; परंतु किनारा सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज हटवण्यास यंत्रणांना अपयश आले आहे. ३५ कोटींचे हे जहाज अवघ्या २ कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनी या संदर्भात कस्टम, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार सुरू केला आहे; परंतु वरिष्ठ पातळीवर अजून याला हिरवा कंदील न मिळाल्याने यंदाचा पावसाळाही जहाज मिऱ्या किनाऱ्यावरच राहणार आहे. मेरिटाईम बोर्डाने याला दुजोरा दिला.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी जहाजाजवळील बंधाऱ्याचे दगड हटवून थोडे खाली बसवण्याचे काम झाले. या बंधाऱ्याच्या कामाचे नियंत्रण असलेल्या पत्तन विभागाने ही माहिती दिली. त्यामुळे पाच वर्षानंतर मिऱ्या समुद्रकिनारा सुरक्षित होईल, असं वाटत होते; परंतु ते कामदेखील लांबले आहे. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे या संदर्भात कस्टम, मेरिटाई बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्याच्या आत ते सडलेले जहाज कापून बाहेर काढले जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु आता महिनाभरावर पावसाळा आला आहे तरी अजून हे जहाज भंगारात काढण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे दोनशे मीटरचे मिऱ्या बंधाऱ्याचे काम रखडले आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली होती.
दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्याला ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मुल्यांकन करेल. त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून, जहाजाजवळील बंधाऱ्याचे मोठे दगड हटवून तो बंधारा खाली बसवला जात आहे. तो आणखी सपाट करून जहाज काढण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु वरिष्ठ पातळीवर याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.