मिरकरवाडा येथे समुद्रात बुडून नेपाळीचा मृत्यू
रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून एका नेपाळी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुखाराम भागी राजी (४३, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, मूळ रा. कैलाली, नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना १० मे रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखाराम राजी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते मिरकरवाडा जेटी येथे सफवान अल हमिदा नावाच्या बोटीजवळ समुद्राच्या पाण्यात बुडालेले आढळले. याची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.