रत्नागिरीत गांजा विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नाचणकर चाळ, मिरजोळे परिसरात कारवाई करत सचिन राजाराम म्हापस्कर (वय ४०, रा. गवळीवाडा, आपकरेचाळ) याला अटक केली. ही कारवाई १० मे २०२५ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन म्हापस्कर हा नाचणकर चाळ परिसरात गांजा विक्रीसाठी आला होता. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिरवट पाने, फळे, बिया आणि काड्या असलेला १५७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे ७२०० रुपये आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश प्रकाश नार्वेकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.