राजापुरात प्रमुख ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव
इच्छुकांचा हिरमोड, ५१ ठिकाणी महिला सरपंच
राजापूर : गावविकासासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायतीला थेट निधी येतो. त्यातून गावविकास साधण्याची आणि थेट लोकांशी संपर्क ठेवण्याची संधी मिळते. त्यामुळे सरपंचपदाला विशेष महत्त्व आहे. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत झाली असून त्यामध्ये ५१ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्याच्या सरपंचपद हे लोकनियुक्त असल्याने त्यासाठी सक्षम महिला उमेदवाराची आवश्यकता भासणार आहे. मात्र, अनेकवेळा सक्षम महिला उमेदवारांची वानवा भासत असल्याने अशा स्थितीमध्ये सरपंचपदासाठी सक्षम महिला उमेदवार शोधण्याचे आव्हानही राजकीय पक्षांसमोर ठाकले आहे.
ग्रामीण भागातील राजकारणावर वर्चस्व राखणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचे सरपंच होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी १४ आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती असे १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आजिवली, हसोळतर्फे सौंदळ, जैतापूर, कोतापूर, नाटे, हातिवले, आंगले, दसूर, चुनाकोळवण, तळगाव, आडवली, मंदरुळ, पांगरे बुद्रुक, सागवे तर, सर्वसाधारण गटातून महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोंडीवळे, तुळसवडे, ससाळे, गोवळ, भालावली, कोदवली, कुवेशी, देवीहसोळ, जुवाठी, शिवणेखुर्द, पाचल, माडबन, गोठणे दोनीवडे, प्रिंदावन, साखर, वडदहसोळ, हरळ, हातदे, खडीकोळवण, कोळंब, सौंदळ, पांगरीखुर्द, कोंड्येतर्फ राजापूर, काजिर्डा, दळे, तेरवण, कारवली, ओझर, रायपाटण, शीळ, करक, धोपेश्वर, राजवाडी, मोसम, शेढे यांचा समावेश आहे. महिला आरक्षणामुळे सरपंचपद हुकल्याने आता इच्छुकांकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीतील उमेदवारीवर वॉच राहणार आहे.