
परशुराम घाटात पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली होती. आता या कामाचा वेग वाढविला असून धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम निम्मे होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच गॅबीयनवॉलच्या पायथ्याचे कामदेखील जोशात सुरू केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. विविध टप्प्यांत काही कामे रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला 22 मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत.
प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यांत वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे, तर दुसर्या बाजूला भरावाच्या ठिकाणी रस्ता व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यासाठी दरडीच्या भागात लोखंडी जाळीच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आठ ड्रील मशिनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे कामदेखिल सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या सहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे. मात्र हे काम उपाययोजनांच्यादृष्टीने कितपत फायदेशीर ठरेल याचा अद्याप अंदाज आलेला नाही. गॅबीयनवॉलच्या माध्यमातून मजबूतीकरण शक्य आहे का, तसेच दरडीची 22 मीटरपेक्षा अधिक उंची असल्याने लोखंडी जाळी त्यापुढे टिकाव धरू शकेल का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.