
कै. वासुदेव सावंत स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सौरिश कशेळकर विजेता
साहस नारकरला उपविजेतेपद
रत्नागिरी : मध्ये मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात कै. वासुदेव सावंत स्मृती २१ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या प्रथम मानांकित सौरिश कशेळकर याने पटकावले. चिपळूणच्या साहस नारकर याने अखेरच्या फेरीत द्वितीय मानांकित यश गोगटे विरुद्ध विजय संपादन करीत उपविजेतेपद पटकावले. चिपळूणच्याच श्रीहास नारकर याने सर्वेश दामले विरुद्धचा डाव जिंकत तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सौरिशचे सहा तर साहसचे पाच व श्रीहासचे साडेचार गुण झाले. आयुष रायकर व यश गोगटे यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला तर आर्यन धुळप सहावा आला.
अनरेटेड खेळाडूंमध्ये अपूर्व बंडसोडे व मुलींमध्ये सई प्रभुदेसाईने प्रथम स्थान प्राप्त केले. १५ वर्षांखालील वयोगटात मंडणगडचा हर्ष चव्हाण , १३ वर्षांखालील वयोगटात अलिक गांगुली , ११ वर्षांखालील वयोगटात राघव पाध्ये , ०९ वर्षांखालील वयोगटात विहंग सावंत व ०७ वर्षे वयोगटात आरव निमकर यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. सई प्रभुदेसाई हीला मागील क्लासिकल स्पर्धेत सर्वोत्तम डाव खेळल्या बद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्री. सत्यशील सावंत यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी रत्नागिरीतील गुणवान फिडे मानांकित बुद्धिबळपटू सोहम रुमडे , वरद पेठे उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा विकास बुद्धिबळ कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेली ही सहावी क्लासिकल स्पर्धा होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. सुयोग सावंत, विवेक सोहनी, मंगेश मोडक , चैतन्य भिडे आदींनी मेहनत घेतली.