
शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा वेग
रत्नागिरी : अकृषक विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने नुकतीच उठवली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील 72 सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग येणार आहे. या निर्णयामुळे पात्रताधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर 2022 ला राज्यातील 15 अकृषी विद्यापीठे व अभिमत विद्यापीठांमधील 659 सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली होती. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची 62 व सहयोगी प्राध्यापकांची 10 अशा 72 पदांचे रोस्टर तयार करण्यात आले. त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रस्तावास मान्यता मिळून भरती प्रक्रिया सुरू झाली, अर्जही मागवण्यात आले. 72 जागांसाठी सहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. राज्यपाल यांनी प्राध्यापक भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने प्रक्रिया थांबली होती. मात्र, पुन्हा स्थगिती उठवल्याने प्राध्यापक भरतीस वेग येणार आहे. निवड समितीच्या सर्व बैठकांचे चित्रीकरण केले जाणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने चित्रीकरण सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच, त्याच दिवशी अथवा दुसर्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे वशिलेबाजी, भ—ष्टाचार, आर्थिक गोष्टींना आळा बसणार आहे.