
जिल्ह्यात सागरी पर्यटनाच्या सुविधांची वाणवा; पर्यटन उद्योग भरभराटीस ‘ब्रेक’
रत्नागिरी: कोकणला सर्वाधिक म्हणजे तब्बल 720 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला सर्वात जास्त म्हणजे तब्बल 237 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, जिल्ह्यात सागरी पर्यटनाच्या सुविधाच नसल्याने येथे बाहेरून आलेला पर्यटक फार वेळ थांबत नाही. परिणामी, पर्यटन उद्योग भरभराटीस येऊ शकलेला नाही. त्या द़ृष्टीने सागरी पर्यटनाकडे पाहणे जरूरीचे असून, पश्चिमेकडील सागरी किनारे आणि पूर्वेकडील सह्याद्री निसर्ग पर्यटन या माध्यमातून कोकणच्या पर्यटनाला चालना मिळाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.
कोकणपट्टी ही चिंचोळी आहे. पुर्वेला सह्याद्री पर्वत तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. या मधोमध कोकणपट्टी वसलेली आहे. येथे लोकसंख्या विरळ आहे. 720 कि.मी. समुद्रकिनार्यापैकी रायगड जिल्ह्याला 122, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120, ठाणे व पालघर जिल्ह्याला 127, मुंबई शहर व उपनगरला 114 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. या दरम्यान अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. नारळ, पोफळी व सुरूच्या बागांनी बहरलेले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतातच. मऊ रेशीम वाळू, समुद्रातून उसळणार्या लाटा आणि समुद्राची गाज ऐकत किनार्यावर निवांत वेळ पर्यटक घालवू शकतात. मात्र, कोकणातील अनेक समुद्रकिनार्यावर अशा सुविधाच नसल्याने पर्यटकांनी थांबायचे कुठे? हा प्रश्न निर्माण होतो.
कोकणातील रेवस ते तेरेखाल या 720 कि.मी. लांब किनारपट्टीवर सुमारे शंभर ते सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यातील काहीच समुद्रकिनार्यांनी पर्यटकांच्या यादीत स्थान मिळविले आहे तर अनेक दुर्लक्षित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळासला आज कासवांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या किनार्यावरील थंड हवा, तांबूस वाळू अनुभवणे आनंददायी आहे. केळशीतील समुद्रकिनारा उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांना आकर्षित करतो. सावणे हा पर्यटन नकाशावर परिचित नसलेला मात्र टेकडीवरून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे दर्शन देणारा सुंदर किनारा आहे. आंजर्ले, कोळथरे, गुहागर हा शहरातच स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारा आहे. तसेच बुधल, हेदवी, वेळणेश्वर, कारूळ. जयगडजवळील अंबुवाडी, रीळ, मालगुंड, गणपतीपुळे, आरे-वारे, भंडारपुळे, गणेशगुळे, वेत्ये, गोडीवने, भाट्ये, पावस हे समुद्रकिनारे निसर्गसौंदर्याने नटलेले आहेत. मात्र, पर्यटकांसाठी या किनार्यावर सुविधाच उपलब्ध होत नाहीत. काही मोजकी पर्यटनस्थळे म्हणजेच गणपतीपुळे, मुरूड, कर्दे असे काही किनारे सोडल्यास अन्यत्र पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. या ठिकाणी असणार्या सुविधा देखील अपुर्या आहेत.
लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करावा…
अनेक ठिकाणी दर्जेदार जेवण, नाष्टा, चहादेखील मिळत नाही. राहाण्याची सुसज्ज व्यवस्था नाही. वाहतुकीची साधने नसल्याने स्वच्छ, सुंदर निसर्ग असताना देखील पर्यटक अशा समुद्रकिनार्यांवर फिरकत नाहीत. याचा कोकणातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
किनार्यावर जायला रस्ते खड्डेमय…
समुद्रकिनार्यावर जायला रस्ते धड नाहीत, मुख्य रस्तेदेखील खड्डे व समस्यांनी वेढलेले आहेत. वाहतुकीच्या सुविधा नाहीत. महत्त्वाच्या समुद्रकिनार्यांवर देखील प्रकाश योजनेची व्यवस्था नाही, सागरी पर्यटनासाठी लागणार्या आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत.