चिपळूण येथे आगार कर्मचाऱ्याला मारहाण
चिपळूण : सर्व्हिस रस्त्यावर बस थांबवली म्हणून त्याचा राग येऊन वालोपे येथील एका व्यक्तीने चिपळूण आगाराच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली व धमकी दिली. संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश सखाराम आयरे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) घडली. रतन संभाजी दहिफळे हे आपल्या ताब्यातील बस घेऊन चिपळूण ते खेड असा प्रवास करत होते. वालोपे रेल्वेस्थानकाच्या समोरील सर्व्हिस रोडवर त्यांनी आपली बस थांबवली, त्यावेळी आयरे हे समोरून दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांची दुचाकी एसटी बसच्या समोर आडवी उभी केली आणि बसच्या चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहिफळे हे खाली उतरले आणि त्यांनी मला शिवीगाळ का करता, अशी विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आयरे यांनी दहिफळे यांना त्यांची कॉलर धरून मारहाण केली, तसेच साक्षीदार विठ्ठल प्रल्हाद जाधव यांनाही मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादी दहिफळे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.