
अखेर उक्षी घाटातून अवजड वाहतूक बंद
संगमेश्वर
गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना मे ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडल्या होत्या व आजही घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता अरुंद, वळणाचा व घाट असल्यामुळे कंटेनरसारखी मोठी वाहने अडकून वाहतूक कोंडी होत होती. या बाबत उक्षी ग्रामस्थांनी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र या घाटात सलग तीन-चारवेळा मोठे कंटेनर अडकल्याने अखेर बांधकाम विभागाने उक्षी घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले आहेत. त्यामुळे उक्षी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे.
उक्षी घाटात १९ मे २०२४ रोजी एका खासगी आराम बसचा अपघात झाला होता. अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यानंतर ५ जून २०२४ रोजी एक गॅस टँकर येथे अडकला होता. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे कोळसा भरलेला ट्रक अडकला होता. त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली होती. १९ ऑगस्ट रोजीही अशाचप्रकारे एक ट्रक सायंकाळच्या सुमारास या घाटात फसला होता. अशा अनेक घटना घडल्या होत्या. या वाढत्या घटना लक्षात घेऊन बांधकाम विभागाने करबुडेतील उतारावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा बोर्ड लावला आहे. तर वांद्री येथून उक्षी ब्रीजवर घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असलेला फलक लावला आहे.