
भागोजीशेठ कीर पुण्यतिथीनिमित्त सहभोजन, सहभजनाचा कार्यक्रम
रत्नागिरी : भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या 81 व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने 24 फेब्रुवारी रोजी रॅली, सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कीर यांच्यासह माजी जिल्हा माहिती अधिकारी आणि समाज नेते प्रभाकर कासेकर, कार्यवाह चंद्रहास विलणकर, माजी कार्यवाह दिलीप भाटकर, सदस्य सुहास धामणसकर, आदेश भाटकर, कौस्तुभ नागवेकर उपस्थित होते. रत्नागिरीत काढण्यात येणाऱया रॅलीची सुरुवात 24 रोजी सकाळी 9 वा. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरापासून होईल. त्यानंतर ही रॅली प्रमोद महाजन क्रीडासंकुल जवळून आठवडा बाजार येथून एसटी बसस्थानक, जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमण करेल. त्यानंतर मारुती मंदिर येथून जयस्तंभ राम आळीमार्गे पतितपावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त होईल. रॅलीनंतर पतितपावन मंदिरात बांधकाम व्यावसायिक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट भजनीबुवा अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार केला जाणार आहे.
संत गाडगेबाबा, श्रीमान भागोजीशेठ कीर व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत सकल हिंदू समाजातील विविध ज्ञातीच्या लोकांना एकत्रित करून सहभोजनाला सुरुवात केली होती. त्याच धर्तीवर गेली 4 वर्षे हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. समाजातील सर्व ज्ञातीच्या लोकांचा एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्यानंतर विविध भजनीबुवांचा सहभाग असलेल्या भजनाच्या गजरातून भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. समस्त रत्नागिरीकरांनी या सहभोजन व सहभजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ अध्यक्ष राजीव कीर यांनी केले आहे.