
गुहागरचा सुपुत्र अमेरिकेमधील पहिला मराठी आमदार
गुहागर : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढवलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपुत्र संतोष दिनकर साळवी यांनी बोस्टनजवळील न्यु हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार झाले आहेत. एका मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवून ऐतिहासिक विजय मिळवल्याने त्यांचा जामसूत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामदेवता देवस्थान व गुहागर तालुका मराठा समाजातर्फे सन्मान करण्यात आला.
भारतात शैक्षणिक संस्कारात वाढलेले साळवी हे फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. येथे नोकरी करत असतानाच त्यांना अमेरिकन क्षितिज खुणावू लागले. १९९४ला ते अमेरिकेत गेले व सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाले. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने साळवी तेथील भारतीय आणि अमेरिकन समाजाशी चांगलेच एकरूप झाले. दरम्यान, त्यांचा सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी गेली; पण खचून न जाता त्यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. अमेरिकेत राहून करिअर करत असतानाच अमेरिकेतील जे लोकं वयाच्या चाळीशीमध्येच योग्य त्या ज्ञानाअभावी नोकरी गमावून बसतात, पदरी लहान मुले असताना बेकार होतात त्यांना धीराचा हात देऊन आवश्यक ते शिक्षण देऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यांना नोकरी मिळवण्यायोग्य बनवण्याचे कसब त्यांनी मिळवून हजारो अमेरिकन लोकांचे आयुष्य पुन्हा मार्गस्थ करून दिले. इन्स्टिट्यूटचा पसारा वाढू लागला. पुणे, मुंबई, कॅनडा, बहरिन सर्वत्र आयटी स्टाफ ट्रेनिंग जोमात चालू झाले. या जोडीनेच सामाजिक कार्यदेखील वेगात चालू होते. ते इंडियन असोसिएशनचे प्रेसिडेंट झाले.
ते बृहन्महाराष्ट्र अमेरिका संस्थेचे खजिनदार आहेत. अमेरिका, कॅनडामधील सर्वोच्च असणाऱ्या या संस्थेचे खजिनदार म्हणून ते चांगलेच लोकप्रिय आहेत. ते अमेरिकेत सात मराठी शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील आपल्या मराठी मुलांवर मराठी भाषेचे, संस्कृतीचे सर्वोत्तम संस्कार व्हावेत यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल अमेरिकन सरकारदेखील घेतली. त्यांना सर्वोच्च अशा व्हाईट हाऊसमधून मानाची निमंत्रणे येऊ लागली. अमेरिकेची विश्वचर्चित निवडणूक घोषित झाली आणि साळवी यांना ती निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होऊ लागला. त्यांनी या निवडणुकीतदेखील पावले उचलली आणि ते यशस्वी झाले.