
दापोलीत विनापरवाना लाकूड वाहतूक, गुन्हा दाखल
दापोली:- दापोली वनविभागाने गस्तीवेळी ६ फेब्रुवारी रोजी – सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील मौजे टेटवली ते वाकवली मार्गावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली. कारवाईत २३.२३२ घ. मी. लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून ट्रकसह १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजे टेटवली ते वाकवली मार्गावरगस्त घालत असताना एक ट्रक (एमएच ५० एन. १३२९) अकेशिया कामसर किटाची विनापरवाना वाहतूक करताना आढळला. त्याला ताब्यात घेतले असता २३.२३२ घ.मी. लाकूडसाठा असल्याचे आढळले. ट्रक व लाकूड मालासह १३ लाख ६० हजार रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई, रत्नागिरी-चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे वनपाल रामदास खोत यांनी केली. या कारवाई पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. पाटील, वनरक्षक शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव, विश्वभर झाडे यांचा सहभाग होता.