
दापोली नवशी परिसरात बेसुमार वृक्षतोड
दापोली: तालुक्यातील नवशी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. रोज शेकडो टन लाकूड तोडले जात असून, ही तोड कटर यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे. कित्येक टन लाकूड साठा हा परवानगी विनाच विक्री केला जात आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायाला वरदहस्त कुणाचा, असा सवाल उपस्थित होत आहे.
कटर यंत्राच्या सहाय्याने लाकूडतोड केली जात असल्याने काही तासातच जंगले भकास होत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वाडीवस्तीपर्यंत शिरकाव वाढ येऊन पोहचला आहे. या लाकूड तोडी बाबत दापोली वन विभागाशी संपर्क केला असता, याबाबत माहिती घ्यावी लागेल, असे वनविभाग सांगत आहे. या लाकूड तोडीवर वन विभागाच्या अंकुश राहिला नसल्याने लाकूड व्यापारी चांलेच निर्ढावले आहेत.
काही क्षेत्रात लाकुडतोडीची परवानगी घेतली जाते. मात्र, परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात लाकूडतोड केली जाते. शेतकर्यांच्या परवानग्या देखील हे लाकूड व्यापारीच वन विभागात जाऊन घेत आहेत. त्यामुळे आता तरी वनविभाग या वृक्षतोडीवर कारवाई करेल का? अशी मागणी येथील जागरुक नागरिकांकडून केली जात आहे.