
शहरी वाहतुकीच्या तब्बल ९७ फेऱ्या रद्द
रत्नागिरी : एसटी महामंडळाने रत्नागिरी शहरी वाहतुकीच्या फेऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिन्याला ८३ लाख तोट्यात चालणाऱ्या शहरी वाहतुकीतील भारमान कमी असणाऱ्या ९७ फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेआठ लाख रुपये तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. शहरी आणि ग्रामीण वाहतूक एकच करण्याचा एसटीचा प्रयत्न आहे.
एसटी महामंडळाची वार्षिक तपासणी नुकतीच झाली. त्यासाठी विभागीय अधिकारी तपासणीसाठी आले होते. एसटी कार्यशाळेची पाहणी केली, तेथील अडचणी जाणून घेतल्या, माळनाका येथील कार्यालयाची पाहाणी केली. त्यानंतर जिल्ह्यात रत्नागिरीतच सुरू असलेल्या शहरी वाहतुकीचा आढावा घेतला. यामध्ये त्यांच्या लक्षात आले की, दर महित्याला ही शहरी वाहतूक एसटीच्या तोट्यामध्ये भर घालत आहे.
रत्नागिरी शहर आणि तालुक्यासाठी ३३ बस आहेत. त्यांच्या दिवसाला सुमारे ७१६ फेऱ्या होतात. शहरी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला दर महिन्याला ८३ लाख रुपये तोटा सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी हा तोटा अनेक वर्षे सहन करत होती; परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, अनेक फेऱ्यांना भारमानच नाही. रिकाम्या किंवा अगदी चार, दोन, आठ प्रवाशांना घेऊन फेऱ्या माराव्या लागत होत्या, त्यामुळे भारमान नसणाऱ्या अशा ९७ फेऱ्या असल्याचे लक्षात आले.
एसटीने या सर्व फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याची आजपासूनच अंमलबजावणी सुरू झाली. एसटीचा दिवसेंदिवस वाढणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. पाच ते दहा रुपये आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना भुर्दंड पडणाऱ्या या फेऱ्या होत्या. या फेऱ्या रद्द केल्यामुळे एसटीचे महिन्याचे साडेआठ लाख रुपये वाचणार आहेत.
एसटी महामंडळातर्फे ३३ बस शहरी आणि ग्रामीण भागात सेवा देतात. त्यापैकी आता चार गाड्यांचे वेळापत्रक कमी केले आहे. अशी माहिती रत्नागिरी आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली.