
कारच्या धडकेने वायरमन जखमी
लांजा
कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार वायरमन जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड सावंतवाडी येथे शनिवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेले प्रमोद हरिश्चंद्र गुरव (४२, रा.वाकेड गुरववाडी, ता.लांजा) हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून नोकरीला आहेत. गुरव हे शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी आपल्या ताब्यातील होंडा मोटरसायकल (क्रमांक एमएच.०५. डीव्ही. ९६६८) घेऊन वाकेड गावकरवाडी येथून इलेक्ट्रिक वायर दुरुस्त करून मोटरसायकलने बोरथडे फाटा येथील डीपीवर इलेक्ट्रिक सप्लाय चालू करण्यासाठी जात असताना वाकेड सावंतवाडी येथे सायंकाळी ३.४५ वाजता आले असता पाठीमागून आलेल्या आणि मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने (क्रमांक एमएच.०३. बीडब्ल्यू. २२५९) ने मोटरसायकलला मागून धडक दिली. ही कार दिलीप गणपत प्रभू (६८, रा. आशिष नगर, शंकरा कॉलनी, पी.एल.लोखंडे मार्ग गोवंडी, मुंबई) हे चालवत होते.
मोटर सायकलस्वार प्रमोद गुरव हे मोटरसायकल वरून खाली पडून त्यांच्या डोक्याला, खांद्याला तसेच दोन्ही पायांना दुखापत होऊन ते जखमी झाले. खबर महेश मनोहर गुरव (वाकेड गुरववाडी) यांनी लांजा पोलिसांना दिली.