शिक्षक, मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवावी: आ. म्हात्रे
रत्नागिरी
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी प्रामाणिकपणे काम करून आपापल्या शाळेची गुणवत्ता वाढवावी, स्वतः ला चांगल्या सवयी लावाव्यात आणि ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांच्या मुलांना आदर्श विद्यार्थी घडवावा.शासन दरबारी तुमचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास समर्थ आहे.तुमच्यावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक आमदार म्हणून मी तुमच्यापुढे असेन,असा विश्वास कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आज सकाळी ११ वाजता माध्यमिक पतपेढी रत्नागिरी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापक सभेत मार्गदर्शन करताना कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत,रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. लतेश ( मामा) नांदगावकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्यूब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, राज्य मुख्याध्यापक मंडळाचे खजिनदार संदेश राऊत, उपसंपादक रमेश तरवडेकर, जिल्हा सहसचिव कल्पेश दळवी, लांजा तालुका अध्यक्ष संदेश कांबळे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष , जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला यांनी जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रश्न मांडले. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हे सर्व तात्काळ सोडविण्याचे व योग्य ती कार्यवाही करण्याचे सूचित केले तसेच यावेळी उपसंचालक महेश चोथे व शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सर्व प्रश्न समजून घेत ते लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.