प्रचितगड किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेव्याचे होणार जतन
संगमेश्वर: तालुक्यातील तिवरेघेरा प्रचितगड येथील प्रचितगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत या किल्ल्याची दुरवस्था झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जतन करतानाच त्याचे महत्त्व देशाच्या कानाकोपर्यांतील लोकांना समजण्यासाठी प्रचितगड किल्ला विशेष संवर्धन मोहीम संगमरत्न फाऊंडेशनकडून (एनजीओ) राबवली जात आहे. 25 व 26 रोजी किल्ल्यावर स्वच्छता केली जाणार आहे. याद्वारे प्रचितगड किल्ला एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल, असे संगमरत्न फाऊंडेशनचे अल्पेश सोलकर याने सांगितले.
तिवरेघेरा प्रचितगड येथील किल्ले प्रचितगड हा छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनपटाचा साक्षीदार आहे. या ऐतिहासिक गडाचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी प्रथम संगमरत्न फाऊंडेशनने पावले उचलली आहेत. महाराजांच्या संस्कृतीच्या स्मरणासाठी’बलदंड दुर्गमदुर्ग प्रचितगडाची प्रचिती आता कळायलाच हवी’ अशी टॅगलाईन त्यांनी तयार केली आहे. अल्पेश यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील अनेक गिर्यारोहकांनी प्रतिसाद दिला.
त्यात तेजस्वी जावकर (बोरिवली), साक्षी जोशी (ठाणे), नीतेश तरळ (नवी मुंबई), रोहन चव्हाण (रोहा), सूरज गोरिवले (महाड), पूजा आंब्रे (संगमेश्वर) यांच्यासह पन्नास गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही मोहीम इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, गडकिल्ले याबाबत ज्ञान असलेले डॉ. सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येणार आहे.
हा किल्ला शृंगारपूर आणि तिवरेघेरा या गावाजवळून 540 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याकडे येणार्या दोन्ही वाटा सह्याद्रीची मुख्य रांग आणि किल्ला यामधील खिंडीत एकत्र येतात. खिंडीतून पुढे एका शिडीवरून किल्ल्यावर पोहोचता येते.
ती शिडीही खराब झालेली आहे. त्यापुढे कातळात खोदलेल्या 10 ते 12 पायर्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजाची कमान अस्तित्वात नसली तरीही कमान ज्यावर उभी होती, ते खांब आहेत. दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजावर शिल्पकाम होते की नाही, हे समजून येत नाही. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या नाहीत. किल्ल्यात थोड्याच अंतरावर मंदिर व बांधीव तलाव, टाके आहेत.
प्रचितगड किल्ला हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण टोकाकडे भवानीदेवीचे घुमटीसद़ृश मंदिर आहे. मंदिरात मुख्य दोन मूर्ती दिसतात. एक मूर्ती अंदाजे 3 फूट उंच असून, ती भैरवाची असावी, तर दुसरी मूर्ती 2.5 फूट उंच असून, ती देवीची आहे. किल्ल्यावर चार तोफा आहेत. कातळात लेण्यासारखी खोदलेली पाण्याची टाकी असून त्याला खांब आहेत.
मोहिमेत याला देणार प्राधान्य
किल्ल्याजवळील प्रमुख प्रवेशद्वारांची आणि आंतरिक संरचनांची साफसफाई केली जाणार आहे. ऐतिहासिक नोंदींचा वापर करून किल्ल्याचे ऐतिहासिक रूप पुन्हा राखले जाईल. पर्यटनासाठी किल्ल्यावरील पायवाटा, सूचनाफलक आणि मार्गदर्शन सेवा प्रदान केली जाणार आहे. स्थानिक लोकांना शैक्षणिक कार्यक्रम आणि कार्यशाळांद्वारे किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.