
राजापूरात ४ लाख ३० हजार प्रवाशांचे क्युआरकोडद्वारे तिकीट
राजापूर: सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यात येत आहे.एसटी महामंडळातर्फेही प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून राजापूर आगारामध्ये १३२ अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन उपलब्ध झाल्या आहेत. त्याद्वारे प्रवाशांकडून कॅशले, पद्धतीने व्यवहार करताना ‘युपीआय क्युआर कोडद्वारे’ तिकीट आकारणी केली जात आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल ४ लाख ३० हजार ७३५ रुपयांची तिकिटे प्रवाशांनी क्युआरकोडद्वारे काढल्याची माहिती राजापूर एसटी आगार व्यवस्थापक अजितकुमार गोरसाडे यांनी दिली. ग्रामीण भागातील दळणवळणाच्यादृष्टीने एसटीचे महत्व आजही कायम आहे; मात्र, अनेकवेळा एसटीचे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होतो. एकतर, प्रवाशाकडे सुट्टे पैसे नसतात नाहीतर कंडक्टरकडे प्रवाशाला परत देण्यासाठी सुट्टे पैसे नसतात. सुट्ट्या पैशांची ही समस्या सोडवण्यासाठी एसटी महामंडळानेही काळाप्रमाणे बदलून तिकीट काढण्यासाठी मोबाईलद्वारे ऑनलाइन व्यवहार करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात होती. एसटी महामंडळाने अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन आगाराला उपलब्ध करून दिल्या असून युपीआय क्युआर कोडद्वारे तिकीट काढली जात आहेत. त्याला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक गोरसाडे यांनी दिली.