
गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान
गुहागर समुद्र किनारा झाला “चकाचक”
वरवेली गणेश किर्वे
गुहागर : महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या (पोलीस रेझिंग डे )अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत .त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी गुहागर पोलीस परेड मैदान व गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.सदर अभियानामध्ये तीन किलोमीटर समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये गुहागर मधील सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर तालुका पत्रकार संघ, तसेच नगरपंचायत गुहागर, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक, श्री देव गोपाल कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी, शिक्षक, मँगो व्हीलेज, गुहागर,एनसीसी पथक आदी सहभागी झाले होते. या सर्वांचे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. गुहागर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी सतत करत असतात परंतु वर्ष अखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गुहागर मध्ये दाखल झाले होते. तसेच स्थानिक नागरिक सुद्धा या समरकिनारी मनसोक्त आनंद घेत असतात.त्यामुळे समुद्रकिनारी अस्वच्छतेचे प्रमाण वाढले होते. पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर समुद्रकिनारा चकाचक झालेला दिसून येत आहे.गुहागर पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस व समाजामधील जवळीकता व आत्मीयता वाढविणे, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा एक वेगळा संदेश नागरिकांना दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी मानले.