
दिव्यांग बांधवांच्या पाठीशी राहणार: आ. किरण सामंत
लांजा: सर्व दिव्यांग बांधवांच्या अडचणीच्यावेळी मी नेहमी पाठीशी राहणार. तुमच्या घरातील हक्काचा आमदार म्हणून काम करणार. येत्या काळात तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग मदत कक्ष उभारणार असल्याचे प्रतिपादन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी लांजा येथे केले.
दिव्यांग समन्वय समिती लांजा शाखेने सोमवारी 30 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या दिव्यांग मार्गदर्शन संवाद मेळाव्याप्रसंगी आमदार किरण सामंत बोलत होते. याप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, महिला जिल्हा संघटिका मानसी आंबेकर, नायब तहसीलदार अनिल गोसावी, दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, तालुकाध्यक्ष संजय सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव भुस्कुटे, नगरसेवक सचिन डोंगरकर, शिवसेना पदाधिकारी प्रसाद भाईशेट्ये, योगेश पाटोळे, विभागप्रमुख दिनेश पवार, दादा पत्की, नाकाडे, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किरण सामंत म्हणाले, माझ्या कार्यकाळात प्रत्येक दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. तसेच दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात.परंतु इथून पुढे दिव्यांग बांधवांचे दाखले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपोच करण्यासाठी प्रयत्न करणार. तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग मदत कक्ष उभारून विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी असणार्या शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भविष्यकाळात कॅम्प लावले जातील. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी माझ्यावतीने पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी तसेच लांजा तालुका अध्यक्ष संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.