
कबड्डीच्या मैदानावर जखमी कबड्डीपटूची 17 दिवस मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी
पूर्णगड येथील मानस आडिवरेकरचा उपचारा दरम्यान मृत्यू
रत्नागिरी: शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे कबड्डी खेळताना तरुणाला मानेला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी प्रथम रत्नागिरी त्यानंतर कोल्हापूर येथे शेवटी मुंबई येथे हलविण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मानस यशवंत आडिवरेकर (23, रा पूर्णगड रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मानस याची जवळपास 17 दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने क्रीडा प्रेमीमधून हळहळ व्यक्त होत आहे.
मानस हा मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेतील एका संघांत सहभागी झाला होता. 2 डिसेंबर रोजी स्पर्धेतील सामना खेळताना मानस याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मानस याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी प्रथम कोल्हापूर व त्यानंतर मुंबई येथे हलविण्यात आले होते. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने पूर्णगड शोकसागरात बुडाला आहे.