
गुहागरात महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांना बेदम मारहाण
गुहागर:
शहरातील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांना शिवीगाळ करत काठीने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात संस्थाध्यक्षांसह तिघांवर मारहाणीचा व शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुहागर महाविद्यालयातील शिक्षक गोविंद भास्करराव सानप यांनी या बाबतची फिर्याद दिली. यात त्यांनी बुधवारी सकाळी ८.३०च्या दरम्यान महाविद्यालय आवारातील कच्च्या रस्त्यावर ही घटना घडल्याचे म्हटले आहे. फिर्यादी व साक्षीदार अनिल शशिकांत हिरगोंड, संतोष विठ्ठलराव जाधव व निळकंठ सखाराम भालेराव असे महाविद्यालयाला जात असताना महाविद्यालय आवारात प्रवेशद्वारावर गुहागर एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक कार्य व परीक्षांमध्ये होत असणाऱ्या अवैध कामांना असहमती तसेच विरोध दर्शवल्याच्या रागातून संस्थेचे सचिव संदीप भोसले व त्यांच्यासोबत दाखल असणाऱ्या ४ ते५ अनोळखी व्यक्तींनी मला व साक्षीदारांना लाथा-बुक्क्यांनी, लाकडी काठीने, लोखंडी सळईने मारहाण करून दुखापत केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष भोसलेंनी मला व साक्षीदारांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच आम्ही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील झेंडावंदनाच्या कठड्यावर बसले असताना महेश भोसले, संदीप भोसले व त्यांच्यासोबत . असणाऱ्या ४ ते ५अनोळखी व्यक्तींनी आम्हाला शिवीगाळ करत दमदाटी करत मारहाण केली. तसेच रोहन भोसलेंनी काठीने साक्षीदार निळकंठ सखाराम भालेराव यांच्या डाव्या पायावर, हातावर तसेच साक्षीदार अनिल हिरगोंडच्या पायावर, पाठीवर मारहाण करून दुखापत केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. गुहागर पोलीस ठाण्यात महेश भोसले, संदीप भोसले, रोहन भोसलेंवर गुन्हा दाखल झाला आहे.