
गुहागर समुद्रात बुडणार्या तरुणाला वाचविण्यात यश
गुहागर: मित्रांसाेबत समुद्राच्या पाण्यात अंघाेळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या कऱ्हाड येथील तरुणाला वाचविण्यात गुहागर नगरपंचायतीच्या जीवरक्षकाला यश आले. अजित डुंबरे असे या तरुणाचे नाव असून, ही घटना मंगळवारी सायंकाळी गुहागर येथील समुद्रात घडली. केवळ जीवरक्षकाने दाखविलेले प्रसंगावधान आणि तरुणांची मिळालेली साथ यामुळेच तरुणाचे प्राण वाचविण्यात यश आले.
कऱ्हाड येथील अजित डुंबरे हे मंगळवारी आपल्या अन्य ११ मित्रांसोबत गुहागर येथे फिरायला आले होते. सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस स्थानकाच्या मागील चौपाटीवर ही सर्व मंडळी मौजमजा करत होते. त्यातील काहीजण समुद्रात अंघोळीसाठी उतरले. त्यामध्ये अजित डुंबरेही हाेता. त्याला चांगले पोहता येते. परंतु, तोडलेल्या जेटीशेजारी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ताे बुडू लागला. आपला मित्र बुडत असल्याचे कळताच त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला.
त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या संगम मोरे याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेचच किनाऱ्यावरील नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल यांना माहिती दिली. तांडेल यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेस्क्यू बोर्ड घेऊन ते समुद्रात गेले. त्यांनी अजित डुंबरे यांना काही क्षणातच किनाऱ्यावर आणले. त्यांना बाहेर काढण्यासाठी निहाल तोडणकर, संगम मोरे, सदाम बागकर या तरुणांनी मदत केली. किनाऱ्यावर येताच अजित डुंबरे यांनी प्रदेश तांडेल आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.