
वायू गळती बाधित 33 जण पुन्हा रुग्णालयात दाखल
रत्नागिरी: जेएसडब्ल्यू वायू गळती प्रकरणी बाधित विद्यार्थ्यांना अद्यापही त्रास सुरू असून, रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसह एकूण 33 जणांना पुन्हा खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन प्रौढांचा समावेश आहे. या प्रकारामुळे जयगडमध्ये पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे जेएसडब्ल्यू एनर्जी आणि जेएसडब्ल्यू पोर्ट अशा दोन भागांत उद्योग सुरू आहे. यातील पोर्ट विभागामार्फत एलपीजीची आयात होत असते. या ठिकाणाी गॅस मोठ्या टँकरमध्ये भरून पाठवला जातो. या एलपीजी विभागात गळती होऊन सात दिवसांपूर्वी
70 विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. या सर्वांनी जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या सर्वांना दोन व तीन दिवसांनी प्रकृती सुधारल्यानंतर घरी सोडण्यात आले होते.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून या विद्यार्थ्यांना पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ असे त्रास पुन्हा होऊ लागले. त्यामुळे तीन दिवसात तब्बल 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 31 जण एका खासगी रुग्णालयमध्ये आहेत. यात 29 विद्यार्थी व दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे तर दुसर्या खासगी रुग्णालयात दोन छोट्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
एका खासगी रुग्णालयात असणार्या 29 विद्यार्थ्यांमध्ये 4 मुले व 25 मुलींचा समावेश आहे. या सर्वांवरील धोका टळला असला तरी दूरगामी परिणाम त्यांना होऊ नयेत यासाठी तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सध्या चौकशी समितीच्यावतीने या परिसरात जाऊन चौकशी केली जात आहे.