
जिल्ह्यात धावताहेत अडीच कोटीच्या परदेशी कारसह नऊ लाखाची दुचाकी
रत्नागिरी: जिल्ह्यात अडीच कोटीची चारचाकी कार आणि नऊ लाखाची दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. साहजिकच रत्नागिरीकरांना याचे कुतुहल वाटणारच. मोठ्या शहरांमध्ये अलिशान, महागड्या आणि परदेशी गाड्यांची क्रेझ आहे. परंतु आता ही क्रेझ रत्नागिरीकरांनाही आहे. परदेशी बनावटीची १६ वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर दिमाखात धावत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या वाहनांची नोंद आहे.
सिनेसृष्टीमधील मोठ मोठे अभिनेते, क्रिकेटपट्टू आदींध्ये महागड्या आणि परदेशी बनावटीच्या जास्त सीसीच्या कार आणि बाईकची मोठी क्रेझ असते. मुंबई, पुणे, नाशिक, आदी मोठ्या शहरांमध्ये ती क्रेझ पहायला मिळत होती. परंतु रत्नागिरीत अशा महागड्या आणि परदेशी बनावटीच्या गाड्या आहेत याच्यावर विश्वास बसणार नाही, परंतु रत्नागिरीतही महागड्या आणि परदेशी गाड्यांची हौस असलेले अनेकजण आहेत हे स्पष्ट झाले आहे. मोठे उद्योजक, व्यावसायिकांकडे आलिशान इम्पोर्टड गाड्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे करोडो रुपयांच्या गाड्या आता दिमाखात रत्नागिरीतील रस्त्यांवरून धावू लागल्या आहे.
रत्नागिरीत एक कोटीपेक्षा अधिक किमतीच्या तीन कार आहेत, तर सुमारे साडेनऊ लाखांची दुचाकीही आहे. जिल्ह्यातील तीन श्रीमंत व्यक्तींकडे इम्पोर्टेड कार आहे. यापैकी एका कारची किंमत २ कोटी ३६ लाख, तर दुसरीची १ कोटी २४ लाख आणि तिसरी कार १ कोटी ४ लाखांची आहे. जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात १६ परदेशी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे.