
लांजातील वेरळ, अंजणारी घाटात दोन कंटेनर पलटी, चालकाने उडी घेतल्याने गंभीर जखमी
लांजा : तालुक्यातील वेरळ घाट आणि अंजणारी घाट या दोन्ही ठिकाणी मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ट्रेलरचे अपघात झाले. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रेलर मधील चालकाने चालत्या गाडीतुन बाहेर उडी घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारा ट्रेलर वेरळ घाटात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता. यानंतर तब्बल पाच तासानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ट्रेलर उचलून बाजूला करण्यात आला. या दरम्यान वेरळ घाटात एकेरी वाहतूक सुरू होती.
तसेच अंजणारी घाटात मुंबईहून गोव्याच्या दिशेने लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाने चालत्या ट्रेलर मधून उडी घेतली. संबंधित चालकाला उडी घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि ट्रेलर रस्ता सोडून बाहेरील बाजूस गेला.
सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या दोन्ही अपघातांची माहीती वेरळचे पोलीस पाटील महेश गजबाल यांनी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना दिली. यानंतर अपघातस्थळी लांजा पोलीस तात्काळ दाखल झाले होते. त्यांनी वाहतून पूर्ववत केली.