
गणेशोत्सवासाठी तब्बल ४८०० एस.टी. बसेस कोकणात दाखल होणार
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी तब्बल ४८०० एस.टी. बसेस कोकणात दाखल होणार असून, यातील सुमारे ३ हजार बसेस एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत. उर्वरित बसेस या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. लाडक्या गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी केवळ १ दिवस उरला असून, लाखो चाकरमान्यांना कोकणातील घरी येण्यासाठीचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतून एस.टी. बसेस येण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात सुमारे ३ हजारहून अधिक एस.टी. बसेस येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हजार एस.टी. बसेस येणार आहेत. रत्नागिरीत ४ सप्टेंबरपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ झाल्या. दि. ४ सप्टेंबरला ६०० तर ५ सप्टेंबरला सर्वाधिक ३ हजार गाड्या आल्या. दि. ६ सप्टेंबरला एक हजार, ७ रोजी ३०० गाड्या कोकणात दाखल होणार आहेत. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी, तात्पुरते शौचालय, स्वच्छता आदी बाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून १२ तारखेपासून जादा गाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १७०० गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासासाठी दोन हजारांपेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येणार आहे.
महामार्गावर ३ गस्ती पथके तैनात
कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा, हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्ती पथके तैनात राहणार आहेत. तर खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या ठिकाणी दुरूस्ती वाहने तैनात असणार आहेत.