
चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील पैसे लांबवले
चिपळूण : शहर बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली असताना याच गर्दीचा फायदा उठवून एका बेकरीमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधील चोरट्यानी पैसे लांबवल्याची घडना बुधवारी घडली. हा सर्व प्रकार बेकरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या आधारे पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी सकाळी चिपळूण बाजारपेठेतील एका बेकरीत ही महिला खरेदीसाठी आली होती. या महिलेच्या शेजारी २ व्यक्ती होत्या. महिलेने खरेदी केल्यानंतर बेकरी मालकाला पैसे देण्यासाठी खांद्यावरची पर्स उघडली. मात्र पर्समधील पैसे अचानक गायब झाल्याने ती घाबरली. तिने हा प्रकार बेकरी मालकाला सांगितला. तोपर्यंत तिच्या शेजारी असणारी व्यक्ती तेथून निघून गेली होती. त्यानंतर तातडीने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले असताना २ तरुण सहजपणे पर्समधील पैसे चोरताना दिसत आहेत. पोलिसांनी या दोन तरुणांचा तातडीने शोध घेत सायंकाळी त्यांना उशिरा ताब्यात घेतले.