‘फेरीवाला समिती’ निवड आजपासून
आठ सदस्यांची निवड ; ३० रोजी निकाल जाहीर
रत्नागिरी: शहरातील फेरीवाल्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पथविक्रेता समिती सदस्यांचे व्यासपीठ निर्माण होत आहे. पथविक्रेता समिती निवडण्यासाठी निवडणूक घेतली जात आहे. आठ सदस्यांची ही समिती असणार असून, सदस्य निवडीसाठी आवश्यकता असल्यास मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल ३० ऑगस्टला घोषित केला जाणार आहे.
रत्नागिरी शहरात ७६२ नोंदणीकृत फेरीवाले असून, यांच्या मतदानातून पथविक्रेता समिती बनवली जाणार आहे. या समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली जाणार असून, ही समिती फेरीवाल्यांचे प्रश्न सोडवणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया रत्नागिरी पालिकेच्या सभागृहात होणार आहे. मंगळवारपासून (ता. २७) उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. फेरीवाल्यांच्या या समितीत सर्वसाधारण प्रवर्गातील ३ सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास अल्पसंख्यांक आणि दिव्यांग प्रवर्गासाठी प्रत्येकी १ सदस्य निवडून द्यायचा आहे. निवडणुकीतील वैध उमेदवारांची अंतिम यादी २७ ऑगस्टला निश्चित होणार असून २८ ऑगस्टला चिन्ह वाटप होणार आहे. आवश्यकता असल्यास २९ ला सकाळी ७ ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. ३० ला दुपारी २ वाजल्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर लगेचच निकाल घोषित केला जाणार आहे. नव्याने निवडलेली पथविक्रेता समिती फेरीवाल्यांच्या विकासाचे विषयी अडचणी मांडू शकणार आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभही पथविक्रेत्यांना मिळवून देऊ शकणार आहेत.