
अतिवृष्टीने भारजा नदीला पूरसदृश्य स्थिति, भोळवली धरण 100 टक्के भरले
नदीकिनारी भागातील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारामंडणगड : दोन दिवसांपासून तालुक्यात रौद्र रुप धारण केलेल्या संततधार पावसामुळे रविवारी सकाळी मंडणगड शहरातील गांधी चौकातील पुलाजवळील भराव खचल्याने पुलावरून जाणारी वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. हि वाहतूक बंद झाल्यामुळे कोंझर, अडखळ, टाकवली या गावाकडे जाणारी एसटी व मोठ्या वाहनांची वाहतूक बंद होणार आहे, त्यामुळे या गावांना वाहतुकीच्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान तालुक्यात दोन दिवस संततधार बरसत असलेल्या पावसामुळे भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. भोळवली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरुन व विमोचकातून विसर्ग सुरू आहे. हवामान खात्याच्या सुचनेनुसार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरीकांनी पुराच्या पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवसाच्या संततधार अतिवृष्टीने एकंदरीत तालुक्यातील नियमित जनजीवन विस्कळीत करुन टाकले. दि. 20 जुलै रोजी तालुक्यात सरासरी 91 मिमी तर दि. 21 जुलै रोजी सरासरी 168 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरु होता, तर अनेक ठिकाणी मोबाईलचे नेटवर्कच मिळत नव्हते. तालुक्यातील बामणघर गावातील हसमुख चाकले यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले. या घराचा 19 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील सावित्री भारजा, निवळी या मुख्य नद्यांसह लहान मोठे ओढे दुथडी भरुन वहात आहेत. याचबरोबर चिंचाळी व भोळवली ही दोन धरणे पुर्णपणे भरली असून अन्य धरणे पंच्यानव टक्याहून अधिक पातळीत भरली आहेत. मांदिवली व चिंचघर ला जोडणाऱ्या पुलासह तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या मोरी व कॉजवेवरुन पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला.
चौकट –
गांधी चौक पुलाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष – मंडणगड नगरपंचायतीच्या अखत्यारीत असलेला शहरातील गांधी चौकातील पूल हा सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल आहे. वाहतुकीसाठी कमकुवत होत चाललेल्या या पुलाला पर्यायी नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी गांधी चौक परीसारतील रहिवासियांनी सातत्याने केली आहे. मात्र नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्सेकडे कायम दुर्लक्ष केले असल्याची प्रतिक्रिया शहरवासीय आता व्यक्त करू लागले आहेत.