
अंशकालीन महिला आरोग्य परिचर १ जुलैपासून संपावर
रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील १९६६ पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे या महिला विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करत आहेत. जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्रित येत आक्रोश आंदोलन केले होते. यावेळी शासनाने या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते; मात्र अद्याप याबाबत काहीच कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या महिला परिचरांनी पुन्हा शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. किमान वेतन २१ हजार रुपये देण्यात यावे, अंशकालीन नावात बदल करावा, प्रसूती रजा मंजूर करावी, प्राथामिक आरोग्य केंद्रात एक पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर देण्यात यावे, अशा मागण्या आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा आकांक्षा कांबळे, स्वराली आगरे, कल्पना नार्वेकर, आदी उपस्थित होते.