
अंगणवाडी कर्मचारी धडकणार १ जुलै रोजी विधानसभेवर
लांजा (प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी १ जुलै रोजी विधानसभेवर धडक देणार असून या मोर्चात तालुक्यातून सुमारे १०० अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा लांजाच्या अध्यक्ष पुष्पा शेट्ये यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवार दि.१ जुलै रोजी विधानसभेवर अंगणवाडी कर्मचारी यांचा छत्री मोर्चा नेण्यात येणार आहे.मागील दोन अधिवेशनात सरकारने मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युईटी, आहारदरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. पण एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही.मंत्री अदिती तटकरे यानी आशा कर्मचारी यांच्या मानधनवाढ करण्याचा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर मान्य करून घेणार असे लेखी आश्वासन देऊनही काहीच केले नाही.पेन्शन, ग्रॅज्युईटीबद्दलचे प्रस्ताव आचारसंहितेनंतर अडकवले गेले.
या साऱ्या गोष्टिंमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या
मनात प्रचंड चीड आहे. म्हणून याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता छत्री घेऊन आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन कृती समितीतर्फे कमल परुळेकर, शालिनी तारकर,रोहिणी लाड,संज्योक्ती शिंदे ,किशोरी पारकर,आणि हलदणकर यानी केले आहे.