
कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असून लोकसभेला सहा पैकी पाच जागा जिंकून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभेलाही कोकणात महायुतीच्या विजयाचा स्ट्राईकरेट 85 टक्क्याहून अधिक असेल असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदार संघात जे मतदान होईल त्यातील 75 टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मिळेल आणि ते विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकण पदवीधरसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकार्यांची समन्वय बैठक आपण घेतली. यात भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदार संघात पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे येतात. मागील बारा वर्षात निरंजन डावखरे यांनी मतदार संघात चांगले काम कशेले आहे. शाळा, जुनी पेन्शन, पदवीधरांचे प्रश्न यासाठी सातत्याने राज्यसभेत आवाज उठवला आहे÷. त्यांनी केलेली कामे संबंधित विभागात दिसून येतात. त्यामुळे जे मतदान होईत त्यातील 75 टक्के मते डावखरे घेतील असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त करताना कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिध्द होईल असे सांगितले.
जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय यापूर्वी शासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वांनाच माहित आहे की महायुतीच हा प्रश्न सोडवू शकते. राज्य सभेसाठी होणार्या निवडणुकात सर्वच ठिकाणी महायुती विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेसाठी नकारात्मकता पसरवून समाज पातळीवर महायुतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. परंतु त्यांचा गैरसमज निश्चित दूर होईल आणि ते महायुतीच्या सोबत येतील असेही त्यांनी सांगितले. विधानसभेला रत्नागिरी जिल्ह्यात पाचही आमदार हे महायुतीचे विजयी होतील असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी कोण उमेदवार असतील याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही ते म्हणाले.