शेनाळे घाट परिसरात दरड कोसळल्याने दोन बागांचे नुकसान
मंडणगड :- तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने देशमुख वाडी येथे जयंत देशमुख व कौस्तुभ जोशी यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
घाट परिसरात डोंगराकडील बाजू व रस्त्याकडील बाजूने संरक्षक भिंत असावी, या मागणीकरिता सर्व संबंधित यंत्रणांकडे गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही यंत्रणा कार्यवाही करत नसल्याने हवालदिल झालेले शेतकरी जयंत देशमुख यांनी नाराज होऊन स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. देशमुख शेनाळे देशमुख वाडी येथील दोन पिढ्यांचे रहिवासी असून, १९९५ सालापासून सर्व यंत्रणांकडे लेखी निवेदन व तोंडी तक्रारींच्या माध्यमातून पाठपुरावा करीत
याबाबात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभियंता अभिजित झेंडे यांनी विचारणा केली असता शेनाळ व तुळशी घाटात संरक्षण भिंतीचे प्रस्ताव खात्याकडून दिल्ली येथे मान्यतेसाठी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. निधी मंजूर होताच या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.
शेनाळे घाटात अनेकदा दरडी कोसळल्या आहेत, १९९५ सालापासून या परिसरात डोंगर खचण्याच्या लहानमोठ्या दहाहून अधिक घटना घडल्या आहेत.
घाट परिसरात डोंगराकडील बाजू व रस्त्याच्या खालील बाजूने मालकी क्षेत्रात साठ ते सत्तर वर्षे जुन्या बागा असल्याने तेथे संरक्षक भिंती असाव्यात, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत.
शेनाळे घाटात नुकत्याच झालेल्या घटनेत वीज खांबही वाकले आहेत. येथे दरड कोसळली की आमच्या जागेत माती व दगड ढकलून दिले जातात. त्यामुळे परिसरातील घरे व बागेला धोका निर्माण झालेला आहे. या साऱ्याला कंटाळून आपण स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जयंत देशमुख यांनी सांगितले.
वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे २०२४ सालापासून ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, यावर फक्त तोंडी आश्वासनेच मिळाली आहेत. दुसरे शेतकरी कौस्तुभ जोशी यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विविध नैसर्गिक कारणांनी आधीच समस्याग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी करताना त्यांनी योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे.