दापोली पोलिसांची बुरोंडीत मोठी कारवाई; बेकायदा दारूसाठ्यासह एकाला अटक
दापोली:
दापोली तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टीसह देशी-विदेशी बनावटीची दारू हस्तगत केली असून, एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास बुरोंडी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप किसन पारधी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, बुरोंडी बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गल्लीत, एका घराच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडी-झुडपांच्या आडोशाने बेकायदा दारू विक्री केली जात होती.
पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी केतन कमलाकर केळसकर (वय ३२, रा. बुरोंडी) हा विनापरवाना गावठी हातभट्टीची आणि नामांकित कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगून असताना मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २,९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये १० लिटर गावठी हातभट्टीची दारू, देशी बनावटीची विस्की, मॅक्डोल विस्की या गोष्टींचा समावेश आहे:
या प्रकरणी आरोपी केतन केळसकर याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गु.र.नं. ९०/२०२६ नुसार रात्री ९ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.