रत्नागिरी जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर काम
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 812 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे आतापर्यंत 1 लाख 54 हजार 259 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी उच्चदाब व लघुदाब वीज खांब कोसळणे, वीजवाहिन्यांवर मोठमोठी झाडे पडणे, रोहित्रांचे नुकसान होणे तसेच दुर्गम भागांतील रस्ते अडथळ्यांमुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी निर्माण झाल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र प्रतिकूल हवामान, सततचा पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही महावितरणच्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. दिवस-रात्र शिफ्टमध्ये काम करत अनेक ठिकाणी वीजपुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात यश आले असून उर्वरित भागांतील कामेही वेगाने सुरू आहेत.
रत्नागिरी विभागामध्ये 185 उच्चदाब खांब बाधित झाले असून त्यापैकी 164 खांब पूर्ववत करण्यात आले आहेत. 584 लघुदाब खांबांपैकी 506 खांबांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच 37 रोहित्रांपैकी 27 रोहित्रे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. या विभागात एकूण सुमारे 1 कोटी 79 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिपळूण विभागामध्ये 66 उच्चदाब खांबांपैकी 46 खांब आणि 210 लघुदाब खांबांपैकी 168 खांब पूर्ववत करण्यात आले आहेत. 20 रोहित्रांपैकी 16 रोहित्रे सुरू करण्यात आली असून या विभागामध्ये सुमारे 65 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
खेड विभागामध्ये 310 उच्चदाब खांबांपैकी 170, तर 593 लघुदाब खांबांपैकी 383 खांबांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. 27 रोहित्रांपैकी 19 रोहित्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून सुमारे 2 कोटी 17 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत महावितरणने अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. अनेक ठिकाणी झाडे हटवून वीजवाहिन्या दुरुस्त करणे, नवीन खांब उभारणे, तुटलेल्या वाहिन्या जोडणे आणि रोहित्रे कार्यान्वित करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे काही भागांमध्ये दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असला, तरी प्रत्येक बाधित गावाचा वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
महावितरणने नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तुटलेल्या वीजवाहिन्या, वाकलेले खांब यांच्या संपर्कात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीची कामे सुरू असताना नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.