कोकण मार्गावर ट्रॅव्हल्सचे दर गगनाला
चिपळूण ते पनवेल प्रवासासाठी मोजावे लागतायत १५०० रुपये
चिपळूण: उन्हाळी सुट्यांमुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली असतानाच खासगी आरामबसकडून (ट्रॅव्हल्स) तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. विशेषत: कोकण मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाट वाढवण्यात आले असून, त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवाशी वाढीव भाडे नाराजीने मोजत आहेत.
महामुंबई क्षेत्रातून रोज शेकडो खासगी बस सुटतात आणि सुट्यांच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने त्या पटीत बसची संख्या वाढवली जाते, त्याचवेळी तिकीटदरही वाढवले जातात. गणपती, दसरा, दिवाळी, होळी तसेच उन्हाळी सुट्यांमध्ये कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठी असते; मात्र एसटी आणि रेल्वेची तिकिटे ऐनवेळी मिळत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. याच संधीचा फायदा घेत दरवाढ केली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. मुंबई-गोवा मार्गावर सध्या शंभरहून अधिक खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या तुलनेत एसटीच्या फेऱ्या निम्म्यासुद्धा नाहीत. 24 तासात या मार्गावर 40 ते 45 फेऱ्यात होतात. चिपळूण ते पनवेल एसटीने जाण्यासाठी 552 रुपये तिकीट आकारले जाते. त्याचवेळी खासगी वाहनचालक हजार ते पंधराशे रुपये आकारतात. वाहनचालकाच्या केबिनमध्ये बसून जाणाऱ्यांकडून सुद्धा सातशे रुपये तिकीट घेतले जाते.
…………
खासगी आरामबसचे भाडे अव्वाच्या सव्वा
उन्हाळ्यापूर्वी चिपळूण ते पनवेल एसटीचे तिकीट 552 रुपये होते. आजही तेवढेच आहे. खासगी आरामबसवाले चिपळूण ते पनवेल सातशे ते आठशे रुपये आकारत होते. मात्र आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर तब्बल १५०० रुपये आकारत आहेत. चिपळूण ते पुण्यासाठी खासगी वाहन चालक तब्बल १५०० रुपये आकारात आहेत. पर्यटनाचा हंगाम नसताना चिपळूण ते पुण्यासाठी एसटीकडून साडेतीनशे ते सातशेच्या दरम्यान तिकीट आकारले जात होते. त्याचवेळी खासगी वाहन चालक हे सीटमागे हजार रुपये तिकीट दर आकारत होते. पुणे मार्गावर खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. हे वाहनचालक आता पंधराशे, दोन हजार रुपये दराने तिकीट आकार आहेत.
तक्रार करा, कारवाई करू
मुंबई आणि पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. लांब पल्ल्याचे प्रवासी असतील तरच त्यांना सीट दिली जाते, नाहीतर गाडी भरल्याचे सांगितले जाते. प्रवाशांची लूट करणाऱ्या अशा वाहन चालकांची तक्रार केल्यास आम्ही कारवाई करू, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगितले जाते. मात्र नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे खासगी वाहन चालकांचे फावते.
तक्रारीसाठी टोल फ्री नंबर