
राजापूर दुचाकी प्रकरणातील दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यात
राजापूर :राजापुरातील दुचाकी चोरी प्रकरणी असलेल्या आरोपीना प्रथम संगमेश्वर आणि आता पुणे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले असून त्या पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राजापुरात काही दिवसापूर्वी झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी जंगलाचा भाग पिंजून काढून ताब्यात घेतले होते.. यामध्ये तिघा तरूणांचा समावेश होता. त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृह करण्यात आली होती. अन्य दोघे संशयित आरोपी दीपक श्रीमंदिलकर आणि अजय घेडगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासामध्ये या तिघा संशयित आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे असल्याचे समोर आले.
अनेक ठिकाणी केलेल्या गुन्हेची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या पैकी पुणे आणि संगमेश्वर येथून दुचाकीची त्यांनी चोरी केली होती. तर पुणे कोरेगावपार्क सह पुणे फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. पुणे शहर कोरेगाव येथून स्कुटीवरून जाणऱ्या दोन मुलींच्या हातातील अॅपल कंपनीचे मोबाईल त्या दोघा संशयितांनी हिसकावून घेतले होतें. त्या तिघा संशयितानी मुंबई-गोवा महामार्गांवर ओणी येथे दहशत दाखवून काही जणांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. व तेथून अणुस्कुरा मार्गे पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न राजापूर पोलिसांनी हाणून पाडला होता. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती. राजापुरातील त्यांचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नव्हता. यावेळी राजापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. राजापूर पोलिसांनी पकडलेल्या त्या संशयितांकडे दोन अॅपल कंपनीचे मोबाईल सापडले होते.