
गांजा बाळगल्याच्या आरोपातून नऊ वर्षांनी निर्दोष मुक्तता
खेड: फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी समिर जसनाईक, गुलाम कादरी, मुद्रसर डावरे, लतीफ नालबंद, सलमान पावसकर, अब्दुल करीम शेख, यांच्या पैकी काही आरोपींच्या ताब्यामध्ये विक्रीकरीता ३०० ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगलेल्या स्थितीत, त्यांच्या ताब्यातून चिलीम व इतर साहित्यासहीत रंगेहाथ, मौजे- भोस्ते, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे मिळून आला, अशी तक्रार ही फिर्यादी यांनी दिली.
संशयित आरोपींच्या विरूध्द खेड पोलीस स्टेशन येथे अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम-१९८५ कायदा कलम-८ (क), २० (ब), २२ व २७ सह भा.दं. वि. कलम ३४ नुसार तक्रार दाखल करण्यात आली व आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. सदर गुन्हाच्या कामी सर्व आरोपी विरूध्द मा. जिल्हा व सत्र न्यायालय, खेड येथे १४/०७/२०१५ रोजी दोषरोपत्र दाखल करण्यात आले. सदर गुन्हाच्या कामी साक्षीदार तपासण्यात आले. या कामी ऍड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी सर्व आरोंपीच्या वतीने काम पाहिले. ऍड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी युक्तीवाद केला व त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन सर्व आरोपींची मा. जिल्हा व सत्र न्यायालय, खेड यांनी निर्दोष मुक्तता केली.