
वाहन चोरट्यांचे आयफोन शोधण्यात पोलिसांना यश
राजापूर :* दुचाकी वाहन चोरीप्रकरणी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या दोन संशयित आरोपींनी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आपल्याकडे असलेले अॅपल कंपनीचे दोन मोबाईल तसेच दहशत निर्माण करण्यासाठी वापरलेला रिव्हॉल्व्हरसारखा लायटर येरडव – अणुस्कुरा घाटातील जंगलातील खोल दरीत फेकून दिले होते. त्यापैकी ते दोन्ही मोबाईल शोधून काढण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे.
रिव्हॉल्व्हरसारखा दिसणाऱ्या लायटरचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेतील अल्पवयीनासह अन्य दोघे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, काही पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकी चोरीप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीनासह अन्य दोन असे तिघा संशयितांना अटक केली असून अल्पवयीन संशयिताला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य दोघे दीपक श्रीमंदीलकर आणि अजय घेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना राजापुरातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वाहन चोरीप्रकरणी राजापूर पोलिसांकडून अटक झालेला पहिला संशयित आरोपी हा अल्पवयीन आहे. त्याला शनिवारीच पोलिसांनी पकडले होते तर येरडव परिसरातील जंगलात फरार झालेल्या अन्य दोघा संशयित आरोपींना सोमवारी (२० मे) पोलिसांनी राजापूर केल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात अटक केली होती. पोलिस आपल्याला पकडतील, या भितीने त्या दोघा आरोपींनी त्यांच्याकडे असलेले दोन्ही मोबाईल आणि धाक दाखविण्यासाठी वापरलेले नकली रिव्हॉल्व्हर (लायटर) जंगल परिसरातील खोल दरीत फेकून दिले होते, अशी कबुली त्यांनी पोलिसांत दिली होती. नंतर त्या आधारे पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने संपूर्ण जंगली परिसर पिंजून काढला. खोल दरीत उतरुन शोधाशोध घेतली. त्यावेळी खोल दरीत फेकलेले दोन मोबाईल पोलिसांना सापडले. या प्रकरणातील तिघा संशयितांकडे सापडलेली एक दुचाकी ही संगमेश्वर तालुक्यातील असून दुसरी दुचाकी त्यांनी पुण्यात चोरली असल्याची माहिती आरोर्पीनी पोलिसांकडे दिलेल्या कबुली जबाबातून माहिती पुढे आली आहे.